Gauri Garje Palave death case : भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या मृत्यू प्रकरणात गौरी यांच्या कुटुंबीयांकडून अनेक गंभीर आरोप गर्जे कुटुंबावर केल्याने प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानंतर अनंत गर्जे पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे. आता या प्रकरणात अनंत गर्जे यांच्या वकिलांनी कोर्टात मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे अनेक सवाल गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणात उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाच्या युक्तीवादावेळी कोर्टात अनंत गर्जेच्या वकिलांनी प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा केला आहे. त्याच्या पोलीस कोठडीला विरोध करताना न्यायालयात वकिलांनी ही गोष्ट सांगितली. या प्रकरणात डॅा. गौरी पालवे गर्जे यांच्या वकिलांनी आरोपी अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. या मागणीला विरोध अनंत गर्जे यांच्या वकिलांनी करत प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पालवे यांच्या कुटुंबीयांनी गर्जे कुटुंबावर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात कोणती माहिती पुढे येते हे पाहावे लागणार आहे. धक्कादायक माहिती येण्याची शक्यता गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून सखोल चौकशी केली आहे. या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. अनंत गर्जे वरळीतील बीडीडी चाळीत भाड्याने राहतो. या गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाने गर्जेच्या घरी धाव घेतली. गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पथकाकडून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातून हळहळ काल सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी डॅा, गौरी पालवे गर्जे यांच्यावर मोहोज देवढे येथील त्यांच्या सासरच्या घरासमोर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली होती. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर घरापासून काही अंतरावर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : अजित पवारांच्या टीकेला भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांचं रोखठोक प्रत्युत्तर; ‘ते’ प्रश्न उपस्थित करत थेट म्हणाल्या…