मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ब्ल्यू टिक गेले; वेबसाईटही बंद

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे ब्ल्यू टिक काढून घेण्यात आले आणि या हँडलवर क्लिक केलं की, सध्या रॉक अँड रोल असे नाव दिसत आहे. या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव ShivSenaUBT_ असे ठेवण्यात आले. शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचेही ब्ल्यू टिक गेले असून त्या हँडलचं नाव आता ShivsenaUBTComm असे ठेवण्यात आले आहे.
इतकेच नाही तर ठाकरे गटाने वेबसाईटबाबतही मोठा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट वेबसाईटच्या नावातही बदल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ट्विटरच्या नियमांनुसार कोणत्याही हँडलला विशिष्ट तपासणीनंतर ‘व्हेरिफाईड’ केले जाते आणि त्याचाच भाग म्हणून ब्ल्यू टिक दिले जाते. यानंतर ट्विटर खात्याचे नाव संबंधित खातेधारकाला केव्हाही बदलता येते. या बदलानंतर त्याचा ब्ल्यू टिकच्या स्टेटसवर काहीही परिणाम होत नाही. मात्र, व्हेरिफाईड झालेल्या आणि ब्ल्यू टिक मिळालेल्या खात्याचे ‘हँडल नेम’ बदललं, तर ट्विटर संबंधित खात्याचे ब्ल्यू टिक काढते. त्यामुळे संबंधितांना ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी पुन्हा आधीप्रमाणे अर्ज करावा लागतो.





