प्रभात वृत्तसेवा पुणे – नदीकाठ विकसन प्रकल्पातील संगमवाडी ते बंडगार्डन हे काम अंतिम टप्प्यात आले असताना या प्रकल्पाकडे जाण्यासाठी संगमवाडीच्या सुरुवातीला जागाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना या प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे सहाशे ते सातशे मीटर पुढे जाऊन प्रवेश करावा लागणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा- मुठा नदीकाठच्या ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ विकसन प्रकल्प राबवला जात आहे. या टप्प्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन महापालिका निवडणुकीपूर्वी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरुवातीलाच हे भूसंपादन का केले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नदीकाठ विकसन प्रकल्पात टप्पा क्र. ९ अंतर्गत संगमवाडी ते बंडगार्डन या ३.७ किलोमीटर लांबीच्या परिसरातील नदी सुशोभीकरण केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने बंडगार्डन, संगमवाडी स्मशानभूमी, तसेच संगमवाडी सुरू होताना प्रवेशद्वार निश्चित केलेली आहेत, तर संमवाडीच्या प्रवेशद्वाराच्या नियोजित ठिकाणी सुमारे दोन एकर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वर्षभरापूर्वी सुरू केली असली, तरी या ठिकाणी असलेला ग्रीन बेल्ट आणि जागामालकांच्या मोबदल्याच्या मागण्या या तिढ्यामुळे संपादन रखडले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वावर परिणाम होणार आहे. परिणामी ही जागा ताब्यात येऊन त्या ठिकाणचे प्रवेशद्वार सुरू होईपर्यंत नागरिकांना बंडगार्डन किंवा संगमवाडी स्मशानभूमीच्या बाजूने उपलब्ध रस्ता वापरावा लागणार आहे. वाढीव कामासाठी ७४ कोटी संगमवाडी–बंडगार्डन टप्प्यातील सुशोभीकरण प्रकल्पाचा खर्च ७३.९७ कोटींनी वाढला आहे. या वाढीव खर्चातून फूटपाथ व ट्रॅकची रुंदी ६ मीटरवरून १२ मीटर करण्यात येणार आहे, तसेच चार ठिकाणी नवीन घाट, तीन ठिकाणी डेक आणि नदीपात्रात उतरण्यासाठी ७७ मीटर रुंदीचा रॅम्प अशी अतिरिक्त कामे २०२१ च्या दरसूचीप्रमाणे करण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या कामात वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे हा खर्च वाढला असून, त्यास महापालिकेच्या पूर्वगणक समितीने मान्यता दिल्याचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी स्पष्ट केले.