Apple India profits: अॅपल इंडिया कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ

नवी दिल्ली – आयफोन निर्माण करणार्या अमेरिकन अॅपल इंडिया कंपनीचे भारतातील उत्पादन आणि विक्री वेगाने वाढत आहे. त्यामुळे सरलेल्या 2023-24 या आर्थिक वर्षात या कंपनीचा नफा 23 टक्क्यांनी वाढून 2,746 कोटी रुपयांवर गेला आहे, असे या कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.
गेल्या वर्षी या कंपनीला 2,229 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सरलेल्या वर्षात कंपनीचा भारतातील महसूल तब्बल 36 टक्क्यांनी वाढून 67,126 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी या कालावधीत 49,321 कोटी रुपये होता. सरलेल्या वर्षात कंपनीने आपल्या कामकाजावर 63,397 कोटी रुपये खर्च केले आहेत. अॅपल कंपनीचे भारतात उत्पादन दक्षिणेतील काही राज्यात होत आहे.
या ठिकाणी गुंतवणूक वाढविण्यात आली आहे. कंपनीने चीनमधील आपले कामकाज मर्यादित करून भारतासह इतर देशात कामकाज वाढविण्यास सुरुवात केली आहे. या प्रयत्नांना भारतातून यश मिळत असल्याचे कंपनीने सूचित केले आहे. भारतातील ग्राहक अॅपल कंपनीचे आयफोन वापरण्याचे प्रमाण वाढवीत आहेत.
त्यामुळे कंपनीने मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथे आपली रिटेल स्टोअर उभी केली आहेत. या स्टोअर्सच्या या उद्घाटनासाठी अॅपल कंपनीचे प्रमुख टीम कुक स्वतः भारतात आले होते. या ताळेबंदानंतर कंपनीने भारतातील आपला विस्तार आणखी वाढविण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते.





