पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी – पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर येवा होत असून, परिणामी धरणातून नदीपात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून सांडव्यातून होणारा विसर्ग ८०० क्युसेक इतका झाला आहे.
सध्या धरण ७४.६४ टक्के भरले असून, वाढत्या येव्यानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात कोणीही उतरू नये, तसेच पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, जनावरे इत्यादी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, अशी सूचना पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. सखल भागातील नागरिकांना याबाबत तातडीने माहिती देऊन खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे विसर्गात होणाऱ्या चढ-उताराचा संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जलसंपदा विभागातर्फे करण्यात आले आहे.




