प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार यादीचे प्रारुप निवडणूक विभागाने जाहीर केले मात्र, त्यात प्रचंड मोठ मोठे घोळ समोर येत आहेत. भोसरी परिसरातील बालाजीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील सुमारे ४ हजार ५०० मतदारांची नावे यादीतून गायब असल्याचे उघडकीस आले असल्याचा आक्षेप महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केला आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांच्या मतदार याद्यांचे प्रारुप आज दुपारी जाहीर कऱण्यात आले. प्रभाग रचनेनुसार याद्या फोडण्यात आल्या. बालाजीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील यादी क्रमांक ३८८, ३८९, आणि ३९० मधील सुमारे ४५०० मतदारांची नावेच गायब आहेत. प्रभाग निहाय याद्या फोडतानाच कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दाट संशय सिमा सावळे यांनी व्यक्त केला.या प्रकऱणी आपण निवडणूक विभागाकडे तक्रार कऱणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे बहुसंख्य प्रभागांच्या मतदारयादीत घोळ आहेत. राजकीय सुडापोटी काही नावे, चाळी, सोसायट्या वगळून दुसऱ्याच यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी मतदारांची नावे वगळून भलत्याच प्रभागाच्या यादीत घुसडल्याचेही सांगण्यात आले.निवडणूक विभागाने सर्व प्रभागांच्या यादीत मतदारसंख्या जवळपास सारखी असेल आणि कमी अधिक फरक हा १० टक्केच्या पुढे नसावा असे सांगितले होते. प्रत्यक्षात सर्वात मोठा प्रभाग क्रमांक १ चिखली गावठाण हा ७४ हजार ३४० मतदारांचा आहे, तर थेरगावगावठाण प्रभाग २३ मध्ये फक्त ३४ हजार ७६५ मतदार आहेत. दुपटीपेक्षा मोठा अधिक मतदारसंख्येचे प्रमाण कमी जास्त असल्याने असमतोल वाढला आहे. तब्बल सहा प्रभाग हे ६४ हजारांपेक्षा जास्त मतदारांचे तर पाच प्रभाग हे ४० हजाराच्या आतील मतदारांचे आहेत.