करोना संकटात दिल्लीकरांना दिलासा; केजरीवाल सरकारने घेतला ‘महत्वपूर्ण’ निर्णय

नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कोरोना विषाणू संसर्गासाठीच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या किंमतीत दोन तृतीयांश कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे आता दिल्लीतील सर्व खासगी लॅबमध्ये या चाचणीची किंमत 2400 रुपयांवरून 800 रुपये इतकी कमी होणार आहे. नव्या निर्णयानुसार आरटी/पीसीआर चाचणीचा नमुना होम व्हिजिट म्हणजेच घरी भेट देऊन गोळा केल्यास त्यासाठी 1200 रुपये आकारण्यात येतील. दिल्ली सरकारच्या या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज (सोमवारी) संबंधित मंत्रालय व अधिकाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणीची किंमत कमी करण्याचे निर्देश दिले. केजरीवाल म्हणाले की, कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी सरकारी रुग्णालयांमध्ये विनाशुल्क केली जात आहे, परंतु खासगी रुग्णालयांमध्ये त्याची किंमत कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारने करोना चाचणीचे दर कमी केल्याने अधिकाधिक लोक करोना चाचणी करून घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Delhi Government caps the price of RT-PCR test by private labs at Rs 800 https://t.co/perNbq59jX pic.twitter.com/P3fVKCZobi
— ANI (@ANI) November 30, 2020
व्यापक स्तरावर करोना चाचणी केल्यास करोना संसर्ग रोखण्यास मदत मिळेल. विशेष म्हणजे, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने केजरीवाल सरकार चाचण्यांची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यास करोना संक्रमित व्यक्तीची वेळीच ओळख पटून विषाणूच्या बाधेच्या गतीवर अंकुश ठेवता येईल.





