ICC चा मोठा निर्णय! बांगलादेशमधील राजकीय सत्तांतरामुळे ‘या’ देशात खेळवण्यात येणार टी-20 वर्ल्ड कप

ऑक्टोबरमध्ये महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. बांगलादेश या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होता, परंतु तेथे राजकीय सत्तांतरामुळे तेथील परिस्थिती सामान्य नाही आहे. या कारणास्तव, आयसीसीने आता ही स्पर्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ती यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. युएईच्या शारजाह आणि दुबई या दोन ठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेचे यजमानपदासाठी संभाव्य देशांच्या यादीत भारताचे नाव देखील समाविष्ट केले गेले होते, परंतु बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात रस नसल्याचे सांगितले त्यामुळे आता ही वर्ल्डकप स्पर्धा यूएईमध्ये पार पडणार आहे.
अलिकडच्या वर्षांत यूएई हे क्रिकेटचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. यात जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. ज्यामुळे अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करणे योग्य ठरते. यूएईने 2021 मधील आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कपसह यापूर्वी अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.





