प्रभात वृत्तसेवा पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एकरकमी आर्थिक साहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना बार्टीमार्फत 25 हजार रुपये एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. या योजनेच्या लाभासाठी उमेदवार महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेला असावा. अर्जाचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथून उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करून भरल्यानंतर आवश्यक स्व-साक्षांकित कागदपत्रांसह ई-मेलद्वारे पाठवायचा आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये जात दाखला, जातवैधता, डोमिसाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) बँक पासबुक प्रत, यूपीएससी मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र यांचा समावेश आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. अधिकाधिक पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील वारे यांनी केले आहे.