देशाच्या क्रीडा विकासात पुण्याच्या पत्रकारांचे मोठे योगदान : चंदू बोर्डे

पुणे – खेळाडू व क्रीडा क्षेत्राचा विकास करणे ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट असते. हे आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारित पुण्याच्या क्रीडा पत्रकारांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या क्रीडा विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी येथे सांगितले.
स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई, महाराष्ट्रतर्फे (एसजेएएम) पुण्यातील ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हॅरी डेव्हिड यांचा बोर्डे व माजी डेव्हीसपटू व भारतीय टेनिस संघाचे माजी प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या हस्ते भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाचे (एसजेएफआय) सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना डेव्हिड यांनी सांगितले, ” हल्लीच्या तुलनेमध्ये आमच्या काळामध्ये क्रीडा पत्रकारांना अतिशय अल्प मानधन मिळत असे पण त्यावर समाधान मानून आपण क्रीडा क्षेत्राची सेवा करीत आहोत हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आमच्या वेळच्या पत्रकारांनी देशाचा क्रीडा विकास कसा होईल हेच पाहिले आहे. ही सेवा करताना आम्हाला देखील अतिशय आनंद आणि समाधान मिळाले.
यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे व श्रीराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एसजेएएमचे अध्यक्ष जी. विश्वनाथ यांनी स्वागत केले तर सचिव प्रशांत केणी यांनी आभार मानले. या समारंभास ज्येष्ठ क्रिकेट संघटक रियाज बागवान, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने उपस्थित होते.




