नवी दिल्ली – सरहद्दीवरील तणावानंतर भारत आणि चीनने परस्परांची आयात कमी करण्यासाठी निर्बंध लावले होते. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत चीनच्या रोखलेल्या आयातीला भारताकडून वेगात मंजुरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. चीन सरकारनेही काही दिवसापासून भारताला होणारी रेअर अर्थ मॅग्नेटची निर्यात वाढविली असल्याचेही सांगितले जाते. भारतात ज्या वस्तूंच्या आयातीला परवानगी देण्याचा विचार आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, बूट, गृहपयोगी वस्तू आणि कच्च्या मालाचा समावेश आहे. सरहद्दीवरील तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशाच्या व्यापारावर परिणाम झाला असतानाच मध्यंतरी चीननेे मॅग्नेट पुरवठ्यावर मर्यादा आणल्यामुळे भारतातील विविध क्षेत्रावर याचा नकारात्मक परिणाम झाला होता. त्यामुळे तणाव अधिकच वाढला होता. दरम्यान दोन्ही देशांदरम्यानचा संवाद चालूच असून यामध्ये काही सकारात्मक बाबी झाल्या असल्याचे या घडामोडीवरून दिसून येते. काही माध्यमानी दिलेल्या माहितीनुसार निर्यातीवर लक्ष ठेवणार्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने ज्या वस्तूंची आयात रोखण्यात आलेली आहे, त्याचा तपशील संबंधित विभागाकडून मागविला आहे. प्रत्येक प्रकरणाची चौकशी करून मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. 5 मे 2020 रोजी सरहद्दीवर भारत आणि चिनी सैन्यादरम्यान चकमकी झाल्या होत्या. त्यानंतर भारत – चीन व्यापारात कमी – अधिक प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. चीनने मॅग्नेट निर्यातीला बंदी घातल्यानंतर तो वाढला होता. दरम्यानच्या काळात भारत -अमेरिका आणि चीन -अमेरिकेदरम्यानचा व्यापार थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घेतलेल्या पुढाकाराला महत्व दिले जात आहे. भारत सरकारने चिनी नागरिकांना व्हिसा देण्याबाबतही हात आखडता घेतला होता. ही व्हिसा प्रकरणे लवकर मार्गी लावण्याबाबतही परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पुढाकार घेत आहे. भारतात मेक इन इंडियासाठी चिनी तंत्रज्ञाची गरज असल्याचेही विविध उद्योगांकडून सरकारला सांगण्यात आले होते. भारतीय उद्योगात चिनी यंत्रसामग्री बसविण्यासाठी चिनी तंत्रज्ञाची गरज वाढली असल्याचे समजले जाते. जीएसटी सुधारणानंतर कंपन्यांची विक्री वाढून इन्व्हेंटरी कमी झाली आहे. अशा अवस्थेत टीव्ही, डिशवासर्स, रेफ्रिजरेटरर्स, इत्यादींचे उत्पादन वाढण्याची गरज आहे. त्यामुळे चिनी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञांची गरज वाढली असल्याचे सांगण्यात येते.