नाशिक – माजी मंत्री बबनराव घोलप ( Babanrao Gholap) यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला नाशिकमधून हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र ठाकरेंकडून कुठलेही उत्तर न आल्याने त्यांनी आज अखेर शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान, बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
देवळाली विधानसभा मतदार संघातून पाच वेळा आमदार –
बबनराव घोलप हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. घोलप पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1990 ते 2014 दरम्यान नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले आहेत. आता शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
शिवसेनेत फुट पडल्यानंतरही बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात खासदार हेमंत गोडसेंसह शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला. पण, घोलप यांनी ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते. दरम्यान, बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की उद्धव ठाकरेंसोबत राहणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे.