नवी दिल्ली – रोस्टर पद्धतीतील चुकामुळे गेल्या आठवड्यात भारतातील सर्वात मोठी नागरी विमान सेवा कंपनी असलेल्या इंडिगोची हजारो उडाणे रद्द झाली. याचा इंडिगो कंपनीच्या पतमुल्यांकनावर परिणाम होऊ शकतो असे मत मुडीज रेटींग्ज या पतमुल्यांकन संस्थेने व्यक्त केले आहे. नागरी विमान वाहतूक नियंत्रकांनी संबंधित बदलासंदर्भात एक वर्षापूर्वी माहिती दिली असूनही इंडिगाने त्या संदर्भात योग्य तयारी न केल्यामुळे गेल्या आठवड्यात भारतातील नागरी विमान वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे कंपनीच्या महसुलावर तर परिणाम होणार आहेच त्याचबरोबर यासंदर्भात नियंत्रक कंपनीला आर्थिक दंड करणार आहेत असे मुडीज रेटींग्ज या संस्थेने म्हटले आहे. नियंत्रकांनी दिलेल्या सूचनाचे पालन वेळापत्रकाप्रमाणे करण्यात इंडिगोला अपयश आले आहे. यामुळे इंडिगोच्या कार्यक्षमतेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. याचा भांडवल उभारण्यात त्रास होणार असल्याचे समजले जाते. नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिगोची 1200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर पाच डिसेंबर रोजी 1,600 उड्डाने रद्द करण्यात आली होती. सोमवारी 500 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत पतमानांकन संस्थांनी यासंदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविलेली नसली तरी याबाबत लवकरच तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आता नागरी विमान वाहतूक नियंत्रकांनी संबंधित नियमांमध्ये इंडिगाला 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सूट दिली आहे. दरम्यानच्या काळात कंपनीने वेगात उपाययोजना करण्याची गरज आहे. नियंत्रकांनी वैमानिकांचा ताण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार रात्री बारा ते सकाळी पाच पर्यंत काम करणे म्हणजे रात्रपाळी असे समजले जाणार होते. तर 24 तासात सहा ऐवजी दोन ते तीन लँडिंग पायलटद्वारा व्हाव्यात असे सांगण्यात आले होते. नियंत्रकांनी वरिष्ठ व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेबबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीचे वेळापत्रक नोव्हेंबर पासून कोलमडले आहे. भारतातील नागरी विमान वाहतूक उद्योग वेगाने वाढत असताना भारतातील सर्वात मोठ्या सेवा देणार्या कंपन्या अधिक कार्यक्षम आणि तयार राहण्याची गरज आहे.