Mandakini Khamkar : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांना पक्षाकडून एबी फॅार्म देण्यात आला होता. मात्र, उमेदवारांसाठी घालून दिलेली वेळ न पाळण्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. दिलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे फॅार्म भरण्यास उशीर झाल्याने त्यांचा अर्जच निवडणूक अधिकाऱ्यांनी स्विकारला नाही. या घटनेची राज्यभरात चर्चा होत आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी काल ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यासाठी आयोगाने संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. पण भाजपच्या महिला उमेदवार मंदाकिनी खामकर वेळेत पोहचू न शकल्याने त्यांचा अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची निवडणूक लढविण्याची संधी हुकली आहे. पक्षाचा एबी फॅार्म असूनही वेळेत न आल्याने त्यांना हा मोठा धक्का बसला आहे. या घटनेवरून वेळेचे महत्व काय असते हे अधोरेखित झाले आहे. काल दिवसभर इच्छूक उमेदवारांकडून एबी फॅार्म मिळविण्यासाठी धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मंदाकिनी खामकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना वॉर्ड २१२ साठी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागल्याने त्या वेळेत कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहचू शकल्या नाहीत. यामुळे आता त्यांना निवडणुकीतून बाहेर पडावे लागणार आहे. भाजप काय भूमिका घेणार? दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १३७ जागांवर भाजपने आपले उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीमध्ये २० जागांवर अंतिम निर्णय होत नव्हता. अखेर २० जागांचा पेच सुटला. या निवडणुकीसाठी एक एक जागा भाजपसाठी महत्वाची आहे. अशातच २१२ क्रमांच्या वार्डात भाजपच्या महिला उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा अर्ज स्विकारला नसल्याने भाजपला हक्काचा जागेत मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : शिरुर तालुक्यात जागा विक्रीला नकार दिल्याने शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला