नवी दिल्ली: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) ने फरीदाबादस्थित अल-फलाह विद्यापीठाचे (Al-Falah University) सदस्यत्व तात्काळ प्रभावाने रद्द केले आहे. विद्यापीठाचे आचरण ‘सद्भावपूर्ण स्थिती’मध्ये नसल्याचे कारण देत एआययूने हा कडक निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने आपली अधिकृत वेबसाइटही बंद केली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाशी विद्यापीठातील काही डॉक्टरांचे नाव जोडले गेल्यानंतर हे विद्यापीठ तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. ‘सद्भावपूर्ण स्थिती’ नसल्याने एआययूचा निर्णय भारतीय विश्वविद्यालय संघ (AIU) ने याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय विश्वविद्यालय संघाच्या नियमांनुसार, कोणतेही विद्यापीठ ‘सद्भावपूर्ण स्थिती’त (Good Standing) असेपर्यंतच त्याचे सदस्यत्व कायम राहते.” एआययूने पुढे स्पष्ट केले की, “परंतु, प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून हे लक्षात आले आहे की, हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ सध्या चांगल्या स्थितीत (Good Standing) दिसत नाही.” त्यामुळे, एआययूने कठोर पाऊल उचलत अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाला AIU चे नाव किंवा लोगो कोणत्याही कार्यात वापरण्यास मनाई करण्यात आली आहे आणि तो लोगो त्वरित वेबसाइटवरून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून वेबसाइटही बंद – एआययूने सदस्यत्व रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच, अल-फलाह विद्यापीठाच्या प्रशासनाने आपली अधिकृत वेबसाइट बंद केली आहे. वेबसाइट बंद केल्यामुळे या प्रकरणातील संशय आणि गोंधळात भर पडली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात विद्यापीठाचे नाव समोर आल्याने, आता या संस्थेवर विविध तपास यंत्रणांची नजर असून पुढील कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.