Sheetal Devrukhakar Sheth : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दररोज घडणाऱ्या घडामोडी लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. या महापालिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालेली आहे. निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची नावेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधितांना एबी फॅार्म देण्यात आले. इच्छुक उमेदवारांपैकी काहींना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ इच्छुक होत्या. मात्र, त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेला पर्यायाने आदित्य ठाकरेंना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल देवरुखकर शेठ या भाजपच्या वाटेवर असून त्या भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. या राजीनाम्यातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीनाम्यातून त्यांनी वैयक्तिक कारणास्तव मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा व इतर संघटनात्मक पदांचा राजीनामा मोठ्या जड अंतःकरणाने आपणाकडे सुपूर्द करीत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शीतल देवरुखकर शेठ भारतीय जनता पार्टीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरेंना धक्का तर भाजपचे बळ आणखी वाढणार आहे. कोण आहेत शीतील देवरुखकर शेठ? शीतल देवरुखकर शेठ या मुंबई सिनेट सदस्या आहेत. त्या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर टीम मधील पदाधिकारी होत्या. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जात असत. गेल्या २२ वर्षांमध्ये पक्षाने सोपवलेली सर्व कामे मोठ्या जबाबदारीने, प्रामाणिकपणे व एकनिष्ठतेने यशस्वीरीत्या पार पडली आहेत, असा उल्लेख त्यांनी राजीनाम्यातून केला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी एबी फॅार्म मिळवण्यासाठी जे काही घडले ते संबंध महाराष्ट्र पाहिले आहे. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी उद्धवसेनेच्या उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले. इच्छुकांची संख्या बरीच होती. या सगळ्यात कोणा कोणा संधी द्यायची असा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. पण एबी फॅार्म देणे गरजेचे होते. यामुळे काहींना उमेदवारी मिळाली तर काहींच्या पदरी निराश आली. शीतल देवरुखकर शेठ या देखील उद्धवसेनेच्या निष्ठावानपैकी एक होत्या. मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 51 मधून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या. मात्र, त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असून त्या भाजपमध्ये गेल्यानंतर येथील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा : How To Handle Tantrums: मुलांचा राग आणि टॅन्ट्रम कसे शांत करायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला