पिंपरी | जुगारअड्डा, अंमलीपदार्थ प्रकरणी मोठी कारवाई

लोणावळा,(वार्ताहर) – लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह एक दमदार कारवाई केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या कारवाईत पाऊण कोटींच्या मुद्देमालासह जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
गंभीर बाब म्हणजे जुगार खेळणाऱ्यांपैकी एका व्यक्तीजवळ २० हजारांचे प्रतिबंधित अंमलीपदार्थ सापडले असून यामुळे अंमलीपदार्थ प्रकरणी लवकरच मोठी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत,
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह सोमवारी रात्री त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकला.
यावेळी छापा टाकलेल्या ठिकाणी अनेकजण जुगार खेळताना रंगेहात सापडले. पोलिसांनी, राहुल भरत इंगुळकर (वय ३४, रा. वाकसई शेजारी ता.मावळ), संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय ३६, रा. वेहेरगांव ता.मावळ),
मंगेश विठ्ठल देशमुख (वय ४६, रा.वेहेरगांव ता.मावळ), संजय विठ्ठल देशमुख (वय ४३, रा.वेहेरगाव ता.मावळ), दिनेश पांडूरंग गायकवाड (वय ४०, रा.वेहेरगाव ता.मावळ), चंद्रकांत हौजी देवकर (वय ४२, रा.वेहेरगाव ता.मावळ),
विनोद शरद नाणेकर (वय ४२, रा.वेहेरगाव ता.मावळ), अजित सुनिल देवकर (वय २९, रा.वेहेरगाव ता.मावळ), मंगेश मारुती राणे (वय ४०, रा.कामशेत ता.मावळ) संतोष काशिराम दळवी (वय ४५, रा.वेहेरगाव ता.मावळ) यांना जुगारअड्ड्यावर रंगेहात ताब्यात घेतले.
तसेच, पंचासमक्ष पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची झडती घेतली असता यातील संतोष काशिराम दळवी (वय ४५ वर्ष, रा. वेहेरगाव, ता.मावळ) याच्याजवळ २.०३० किलोग्रॅम वजनाचे २०,३०० रुपये किमतीचे प्रतिबंधित एमडी पावडर हे अंमली पदार्थ आढळून आले.
त्याने हे अंमलीपदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे चौकशीत समोर आले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, लोणावळा ग्रामीण ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ५ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क) २१ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईमध्ये नमुद सर्व आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम,
वाहने आणि इतर साधने असा एकूण ७४ लाख १४ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि शेवते, पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ मंगेश मारकड यांच्या पथकाने केली आहे.





