वॉशिंग्टन – पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याच्या संबंधात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी विधाने करीत आहेत त्यातून जगाला अमेरिकेकडून चुकीचे संदेश जात आहेत असे अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील बहुतेक साऱ्या माध्यमांनी बायडेन यांचा विजय घोषित केला असला तरी अद्याप ट्रम्प मात्र हा निर्णय मान्य करण्यास तयार नाहीत. त्यांनी अनेक राज्यांमध्ये आव्हान याचिका दाखल करून कायदेशीर पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातून अमेरिकेविषयी जगात चुकीचा संदेश जात आहे ही बाब त्यांनी ध्यानात घेतलेली दिसत नाही असेही बायडेन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प आणि त्यांच्या जवळची मंडळी अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे अमेरिकेच्या लोकशाहीची थट्टा होऊ लागली आहे. या मागे त्यांचा नेमका हेतू काय आहे हे लक्षात येईनासे झाले आहे असेही बायडेन यांनी म्हटले आहे. ते आज विलमिंगटन येथे एका कार्यक्रमात बोलत होते. ट्रम्प आत्ता जे काही करीत आहेत त्यातून अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार अध्यक्ष अशी त्यांची पुन्हा एकदा नोंद होंणार आहे हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असेही बायडेन यांनी त्यांना उद्देशून म्हटले आहे.
आपण पराभूत झालो आहोत हे त्यांच्या चांगले लक्षात आले आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीला आपणच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहोत असेही त्यांनी निक्षुन सांगितले. अमेरिकेतील संभाव्य सत्तांतरासाठी प्रशासनातील जे अधिकारी आपल्याला मदत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही बायडेन यांनी दिला आहे.
अमेरिकेचे प्रशासन ताब्यात घेण्यासाठीची आपण तयारी चालवली असून आपण अर्थमंत्री पदासाठीही उमेदवार निश्चीत केला आहे. त्यांचे नाव आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावेही लवकरच जाहीर केली जातील असेही बायडेन यांनी नमूद केले.