बिडेन बहुमताच्या समीप; अध्यक्षपदासाठी हवे फक्त एक राज्य

वॉशिंग्टन – अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक अटीतटीची सुरू असून निर्णायक मानल्या जात असणाऱ्या तीन राज्यांतील एक ज्यो बिडेन यांनी जिंकले आहे. आता ते 270 आकड्याच्या समीप आहेत. यामुळे आता डोनल्ड ट्रम्प यांना उरलेली सर्व राज्य जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे ज्यो बिडेन यांना आणखी एका राज्यात विजय मिळाल्यास ते अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतील.
जाहीर झालेल्या इलेक्ट्रोल वोट्सच्या आकड्यांनुसार ज्यो बिडेन यांच्याकडे 264 जागा आहेत. तर ट्रम्प यांनी 213चा आकडा गाठला आहे. बहुमतासाठी 270 जागा जिंकणे आवश्यक आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणा-या विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिव्हेनिया या तीन राज्यांपैकी ज्यो बिडेन यांनी विस्कॉन्सिन जिंकले आहे.
यामुळे ट्रम्प यांच्यासाठी विजयी आघाडी आणखी अवघड झाली आहे. या विजयामुळे ज्यो बिडेन बहुमताच्या जवळ पोहोचले आहेत. त्याबरोबर ट्रम्प यांचे मतमोजणीबाबतचे आरोप आणखी वाढले आहेत. मिशिगनमध्ये मतमोजणी थांबवण्याची जोरदार मागणी ट्रम्प यांनी केली आहे.





