बियांका : टेनिस विश्वाची ‘धक्कादायक’ तारका

अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने बाजी मारली. नदालचे हे 19 वे ग्रॅंडस्लॅम आहे या विजेतेपदासोबतच त्याने रॉजर फेडररच्या 20 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदाचा विक्रम तोडण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

राफेल नदालचे विजेतेपद अपेक्षितच होतेच पण खरी करामत केली ती कॅनडाच्या बियांका आंद्रेस्क्‍यू या 19 वर्षीय युवा टेनिसपटूने बियांकाने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनुभवी टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्स हीचा सहज पराभव केला.

बियांकाचे हे विजेतेपद अनेक अर्थाने महत्वपूर्ण मानावे लागेल कारण या विजेतेपदासोबतच टेनिसविश्वात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. सेरेना व व्हीनस विल्यम्स या दोन भगिनींनी मागील दोन दशके टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवले. टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रॅंडस्लॅमचा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे. मार्गारेट कोर्ट यांनी 24 ग्रॅंडस्लॅम जिंकले आहेत तर सेरेना विल्यम्स हिने 23 ग्रॅंडस्लॅम. सेरेनाला मार्गारेट कोर्ट यांचा विक्रम मोडण्यासाठी 2 ग्रॅंडस्लॅम विजेतपदाची गरज आहे हा विक्रम मोडण्यासाठी सेरेना प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. पण मागील दोन वर्षांपासून तिला त्यात यश येत नाही. असे असले तरी तिने टेनिस विश्वात स्वतःचा वरचष्मा कायम ठेवला आहे.

गेल्या दशकभरात तिचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही म्हणूनच बियांका ही सेरेनाचे वर्चस्व मोडून काढेल असा विश्वास टेनिस रसिक व्यक्त करीत आहेत. बियांका ही भावी टेनिस सम्राज्ञी असेल असेही भाकीत काही जाणकारांनी वर्तवले आहे. याला कारण आहे बियांकाचा अंतिम फेरीतील सेरेना विरुद्धचा खेळ अंतिम फेरीत सेरेना सारखी अनुभवी खेळाडू समोर असतानाही बियांकाने कोणताही दबाव न घेता नैसर्गिक खेळ केला मोक्‍याच्या क्षणी खेळ उंचावत तिने तिच्या नैसर्गिक खेळावर भर दिला प्रतिस्पर्ध्याच्या खेळातील कच्चे दुवे हेरत तिने स्वतःचा खेळ उंचावला जिद्द चिकाटी आणि कठोर मेहनत या गुणांच्या जोरावर तिने अवघ्या 19 व्या वर्षी ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवण्याची करामत केली.

बियांकाचे हे पहिलेच ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे हे ग्रॅंडस्लॅम तिच्यासाठी आणि तिच्या देशवासीयांसाठी ऐतिहासिक आहे कारण ग्रॅंडस्लॅम जिंकणारी बियांका ही कॅनडाची पहिलीच खेळाडू आहे. बियांकाने आजवर फक्त चार मोठ्या स्पर्धात सहभाग घेतला आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा जास्त अनुभव नसतानाही अंतिम फेरीत सेरेना सारखी मोठी प्रतिस्पर्धी असूनही ती डगमगली नाही. तिने सेरेनाचा प्रत्येक फटका परतावून लावला याउलट तिच्या फटाक्‍यांना सेरेनाकडे कोणतेही उत्तर नव्हते 6-3 7-5 हा अंतिम फेरीतील स्कोरच तिचे अंतिम सामन्यातील वर्चस्व सिद्ध करतो.

किम क्‍लिस्टर ही माजी खेळाडू बियांकाची आदर्श आहे. किम क्‍लिस्टरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच तिने आपला सराव सुरु केला. किम क्‍लिस्टर प्रमाणेच आपणही एके दिवशी ग्रॅंडस्लॅम विजेते होऊ, असे स्वप्न तिने पाहिले. अखेर तिच्या मेहनतीला यश मिळाले तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

Leave A Reply

Your email address will not be published.