भूपेंद्र चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड

लखनौ- भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेश अध्यक्ष पदी जाट नेते भूपेंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. जाट समुदायातील नेते अशी ओळख असलेल्या चौधरी यांची जाटांचे प्राबल्य असलेल्या प. उत्तर प्रदेशात चांगला प्रभाव आहे. दरम्यान, त्रिपुरा भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राजीव भट्टाचार्य यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौदान सिंह यांच्याकडे हिमाचल प्रदेशच्या प्रचार समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.
भूपेंद्र चौधरी हे पश्चिम उत्तर प्रदेशचे नेते आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जाट समुदायात आपली पकड घट्ट करण्याकरता भाजपने त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली असल्याचे मानले जाते आहे. यापूर्वी ओबीसी समाजाचे स्वतंत्र देव सिंह यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
उत्तर प्रदेशच्या योगी मंत्रिमंडळात पंचायत राज मंत्री असलेल्या चौधरी यांनी कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. योगी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातून येतात तर आता पश्चिम भागातून येणाऱ्या चौधरींकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे बोलले जाते आहे.





