Satara – भाजपच्या नेत्याने धमकावल्यानेच भुजबळ बोलताहेत

कोरेगाव – छगन भुजबळ राज्याचे मंत्री आहेत. ते मंत्रिमंडळ बैठकीत अथवा मंत्री उपसमितीमध्ये मराठा आरक्षणाविषयी काही बोलत नाहीत. मात्र, बाहेर जाहीर सभा घेऊन बोलतात, याचाच अर्थ की भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेच त्यांना धमकावले असेल की तुम्ही जामीनावर बाहेर आहात, तुम्ही आरक्षणावर बोला, म्हणून ते बोलत असतील, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. त्यांना घटना संपवायची आहे, म्हणून ते एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
कोरेगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आमदार जाधव आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष, केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाविषयी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठवली. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही. दोन्ही समाजांनी सौम्य भूमिका घ्यावी, शांततेच्या मार्गाने जाऊन निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सहा महिन्यांमध्ये 9 ठिकाणी दंगली झाल्या, हे अत्यंत चुकीचे आहे. कोल्हापूरमध्ये जातीय दंगल होते, हे महाराष्ट्राला कधीही शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष घटनेच्या चौकटीत राहून काम करत नाहीत, ते पदाचे अवमूल्यन करत आहेत, अशी टीका करत आमदार भास्कर जाधव यांनी थेट भाजपवर हल्ला चढविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना भाजपला संपवायची आहे. विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीचे प्रमुख हे घटनात्मक पदावर विराजमान आहेत, त्यांना घटनेने अधिकार दिले आहेत.
मात्र, भाजपला घटना संपवायची असल्याने ते दिवसेंदिवस चुकीचे प्रकार घडवत आहेत. ते थेट घटनेला हात घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याने ते एक- एक करत ते घटनेच्या फांद्या तोडत असून, केवळ एक सुळका ठेवू पाहत आहेत, म्हणून आम्ही शिवसेना भाजपला थेट विरोध करत आहोत, त्यांचे खरे रुप जनतेसमोर आणत असून, त्यांचे पितळ देखील उघडे पाडत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेत नाहीत, वेळकाढूपणा करत प्रकरण ढकलत आहेत. अखेर अल्टीमेटम दिला तरी ते सर्वोच्च न्यायालयाचे ऐकत नाहीत, हे दुर्देवी आहे, अशी टीका त्यांनी केली.
नारायण राणे यांची गेल्या 6 ते 7 वर्षात पाचशे माणसे जमलेली एक तरी जाहीर सभा झालेली दाखवा, नारायण राणे हा संपलेला विषय आहे, त्यांच्यासह त्यांच्या मुलांबद्दल बोलणे हे टाळतोच, असे त्यांनी स्पष्ट केले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर चुकीच्या पध्दतीने मुंबई महानगरपालिकेने खोटा गुन्हा दाखल केला आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत.
मात्र, आज खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे यांना स्टार लागला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहरप्रमुख अक्षय बर्गे, अशोक भोसले, कोरेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पी. सी. भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





