पुणे -भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कांडरे यास अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदौर येथून कांडरे यास बेड्या ठोकल्या. “बीएचआर’ घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून राज्यभरात धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी दि. 17 जून रोजी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर येथे धडक कारवाई करत भागवत भंगाळे, छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील, आसिफ मुन्ना तेली, जळगाव आणि मुंबई येथील दोन महिला, संजय तोतला, राजेश लोहार, प्रीतिश जैन, अंबादास मानकापे, प्रमोद कापसे, आणि पुण्यातील प्रेम नारायण कागोटा यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणात फास आवळण्यास सुरुवात केल्यापासून कांडरे हा पोलिसांना गेल्या 6 महिन्यांपासून गुंगारा देत होता. दरम्यान, तो इंदौर येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सोमवारी मिळाली. त्यानंतर एका हॉटेलमधून त्याला अटक केली. “बीएचआर’ आर्थिक घोटाळा प्रकरणात जितेंद्र कांडरे हा मुख्य सूत्रधार आहे. त्यास सोमवारी रात्री इंदौरमधून अटक केली आहे. त्यास बुधवारी पुण्याला आणून न्यायालयात हजर केले जाईल. – भाग्यश्री नवटके,पोलीस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे