मुंबई – मुंबई शहरातील 80 टक्के जनतेला करोनाच्या सार्स -कोव्ह- 2 या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असण्याची सक्यता असून त्यामुळे तिसरी लाट दुसऱ्या लाटेएवढी भयावह नसेल, असा सकारात्मक अंदाज टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यात फेरसंसर्ग होणार नाही असे गृहीत धरले आहे. तिसऱ्या लाटेत फेरसंसर्ग हा महत्त्वाची भूमिका बजावेल, असे या संशोधनाचे लेखक डॉ. संदीप जुनेजा यांनी म्हटले आहे. करोना गेले 17 महिने भारतात धुमाकूळ घालत आहे. पहिल्या लाटेमध्ये 2020 मध्ये संसर्ग झालेल्यांना त्यांच्या प्रतिपिंडांचे (अँटिबॉडी) प्रमाण कमी झाले असू शकते. या फेरसंसर्गावर लक्ष ठेवल्यास करोनाची तिसरी लाट आटोक्यात आणणे प्रशासनाला सहज शक्य होईल. जुनेजा म्हणाले, ज्या 20 टक्के नागरिकांना करोना झालेला नाही त्यांचे लसीकरण वेगात केल्यास मुंबईकरांना तिसरी लाट सतावणार नाही. आपण फेरसंसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी 80 टक्के बरे झालेल्यांमध्ये 10 टक्के जण फेरसंसर्गाला बळी पडू शकतात. त्यांना संसर्ग झाला तर त्याला पहिल्या खेपेप्रमाणेच उपचाराची गरज भासू शकते. तिसऱ्या लाटेवर सर्वात परिणाम करणारा घटक म्हणजे लसीची कमी परिणामकारकता हा घटक ठरू शकतो किंवा करोना योग्य वर्तणूक न ठेवता 60 टक्के शहर खुले करणेही महाग पडू शकते. या सर्व शक्यतांचा विचार केल्यानंतरही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक तीव्र असेल, असे वाटत नाही. जर फेरसंसर्गाची शक्यता फारशी नसेल, विषाणूची नवी धोकादायक आवृत्ती आली नसेल, ऑगस्टपर्यंत लसीकरण व्यापक स्वरूपात झाले आणि लस 75 ते 95 टक्के प्रभावी असेल तर सप्टेंबरमध्ये तिसरी लाट किरकोळ अस्तित्व दाखवेल, असे जुनेजा म्हणाले. दुसऱ्या लाटेत दिल्ली आणि बंगळुरूच्या तुलनेत संसर्गाची स्थिती मुंबईत कमी होती, कारण पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक होती. दुसऱ्या लाटेत मुंबईत दैनंदिन संसर्ग होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या सुमारे 11 हजार होती. तीच संख्या दिल्लीत 28 हजार आणि बंगळुरूत 25 हजार होती, याकडे या शोधनिबंधात लक्ष वेधण्यात आले आहे.