शासकीय बंगल्यावरील पत्रकार परिषद भोवली; राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

मुुंबई – आचारसंहितेच्या काळात शासकिय बंगल्यावरील पत्रकार परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंगाशी आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचा जाहिरनामा जाहिर करण्यासाठी पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकिय बंगल्याचा वापर केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीच्या बैठका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी 4 या शासकीय बंगल्यावर आयोजित केल्या जात होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहिरनामा प्रकाशन सोहळा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकिय निवासस्थानी पार पडला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या धर्तीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ए-6 या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्याची कॉंग्रेसची योजना होती. पण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला परवानगी कशी दिली, असा मुद्दा कॉंग्रेसने उपस्थित केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्‍लिप तपासून पाहिली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा नोंदवून राष्ट्रवादीला नोटीस बजावण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.