विविध जातीच्या फुले व वनस्पतींमुळे उद्यानात आल्हाददायक वातावरण
ढेबेवाडी -पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील फुलपाखरू उद्यान हिरवाईने नटले आहे. आल्हाददायक वातावरणात फुलपाखरांसह वेगवेगळ्या जातीची फुले व वनस्पती येथे आहेत.
ढेबेवाडी वनखात्याकडून निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आलेल्या भोसगाव फुलपाखरू उद्यानामध्ये अनेक जातीची वृक्षलागवड करण्यात आली आहे. या निसर्गरम्य ठिकाणावरून संपूर्ण ढेबेवाडी खोऱ्याचे विशाल रूप पर्यटकांना भुरळ घालत आहे.
एकीकडे वांग मराठवाडी धरणातील जलाशय आणि सभोवताली मोठी सागाची तसेच रायवळ झाडे. तर दुसरीकडे वाल्मिक पठारावरील उंच डोंगर रांगा व त्यावरून कोसळणारे धबधबे आणि घनदाट झाडीमधून वाट काढणारे पाण्याचे छोटेमोठे स्त्रोत पर्यटकांना भुरळ घालत आहेत.
या उद्यानात जांबळ, कदंबा, पळस, खैर, सिसा, रायवळ, हेळा, आवळा, बांबू, खुळखुळा, हाडसांधरी, गुलमोहर, विलायती चिंच अशा अनेक जातींची वृक्ष लागवड केली आहे. तसेच या पर्यटन उद्यानामध्ये जंगली प्राण्यांची, विविध जातींच्या फुलपाखरांची व पर्यावरणाची माहिती कम्युनिकेशन हॉलमध्ये दिली जाते.
उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडीसह इतर खेळणी असल्याने लहान मुलांचे देखील चांगल्या प्रकारे मनोरंजन होवून अनेक प्रकारची माहिती मिळते. ब्रिटिशकालीन वनविश्रामगृह याच उद्यानाच्या पायथ्याला आहे, हे देखील पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे. ढेबेवाडीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या पर्यटन स्थळाला पश्चिम महाराष्ट्रातील शाळा व कॉलेजनी भेटी दिल्या आहेत. सध्या हे उद्यान पर्यटकांच्या प्रतिक्षेत आहे.
भोसगांवच्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये वनखात्याकडून वन्यप्राणी, फुलपाखरू आणि पर्यावरणाची सखोल माहिती वनखात्यामार्फत दिली जाते.
डी. के. जाधव,वनपाल भोसगांव