प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ ( प्रभाकर तुमकर ) – मावळच्या राजकारणात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची एन्ट्री झाली आहे. पैलवान उपाधीने प्रख्यात असलेले लांडगे यांच्यासाठी मावळ नवीन नसला तरी मित्रपक्षातील आमदाराच्या विरोधातच त्यांना राजकीय डावपेच आखावे लागणार आहेत. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पुणे जिल्हा उत्तर विभागाचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार लांडगे यांची नियुक्ती केली आहे. पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मावळात तरी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे मावळातील प्रमुख नेते व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे व आमदार शेळके या मामा-भाच्यांतील ‘सख्य’ तर संपूर्ण तालुक्याला माहीत आहे. बाळा भेगडे यांच्या मदतीला आता भोसरीतून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले महेश लांडगे असणार आहेत. भाजपच्या पुणे जिल्हा (उत्तर) विभागात मावळ तालुक्याचा समावेश आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दोनदा विक्रमी मताधिक्याने निवडून येऊन निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. स्थानिक स्वराज निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही आहेत. यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. स्वबळावर लढल्यास आणि युतीत लढले तरीही या दोन्ही तुल्यबळ आमदारांची मावळच्या राजकीय रणभूमीत लढत होणार आहे. आमदार शेळके यांची मावळ तालुक्यात मोठी पकड आहे. सुरुवातील आमदार शेळके हे महायुतीत लढण्यास इच्छुक होते. याबाबत त्यांनी वारंवार वाच्यता देखील केली होती. परंतु आता चित्र बदलत आहे. महायुतीत लढल्यास अधिकाधिक आणि जिंकण्याजोग्या जागा मिळविण्यात दोन्ही नेत्यांच्या मुत्सदेगिरीची कसौटी होणारी आहे. स्वतंत्र लढल्यास मित्रपक्षांच्या आणि जवळच्या आमदाराच्या विरोधात जाऊन प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे.जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती बरोबरच लोणावळा व तळेगाव नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीची निवडणूकही होत आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी चा पैलवान मावळच्या आखाड्यात कोणते डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.