Bhor News : कापुरहोळ चौकात तरुणाचा हवेत गोळीबार; राजगड पोलिसांकडून पिस्टल, बुलेट जप्त

कापूरहोळ : राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापुरहोळ चौकात मंगळवारी (दि. ४ जून) सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अनुज दत्तात्रय झेंडे (वय २०, रा. दिवे, ता. पुरंदर) याने पिस्टलमधून हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली. पोलिसांनी त्याच्याकडून सिल्व्हर रंगाचे पिस्टल आणि MH 12 QL 0094 क्रमांकाची बुलेट मोटारसायकल जप्त केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत इंगळे (ब. नं. १७३२) यांच्या फिर्यादीनुसार, अनुज झेंडे याने बुलेट दुचाकीवरून कापुरहोळ चौकात सायलेन्सरचा मोठा आवाज करत प्रवेश केला आणि लाकडी मुठ असलेल्या पिस्टलमधून हवेत फायरिंग केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. गोळीबारानंतर तो नारायणपूरच्या दिशेने पळत असताना मद्यप्राशनामुळे दुचाकीचा तोल गमावून रस्त्यावर पडला. स्थानिक नागरिक गणेश सुनिल लोहार आणि ऋतिक मारुती लोहार यांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून राजगड पोलीस ठाण्यात सुपूर्द केले.
पोलिसांनी अनुजविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्याकडून अंदाजे ५,००० रुपये किमतीचे हत्यार जप्त केले. सपोनि तुकाराम राठोड आणि पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे कापुरहोळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.





