भोर : भोर तालुक्यातील किकवी गावात यंदाच्या गणेशोत्सवाला एक अनोखा आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. गावातील रहिवासी आणि विद्या ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक अनिल लक्ष्मण यादव यांनी आपल्या घरी अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. या रचनेने गावकऱ्यांसह भाविकांना खऱ्या राम मंदिरात प्रवेश केल्याचा अनुभव दिला आहे. या देखाव्यासाठी पुष्टा एमडीएफ, दोरा आणि ऑइल पेंटचा वापर करून अत्यंत बारकाईने रचना तयार करण्यात आली आहे. विशेषतः गर्भगृहातील श्रीरामांच्या मूर्तीला प्रकाशयोजना आणि कलात्मक सजावटीमुळे मंदिरातील वास्तविक गर्भगृहाचा भास होतो. यामुळे भाविकांना अयोध्येतील राम मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन घडत आहे. अनिल यादव यांच्या पत्नी रत्नमाला अनिल यादव, ज्या कामथडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, यांनीही कलेच्या आवडीतून या देखाव्याच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या दाम्पत्याच्या संयुक्त प्रयत्नांनी साकारलेली ही रचना गणेशोत्सवात किकवी गावाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत असून, अप्रतिम शिल्पकला आणि भक्तिमय वातावरणाने सर्वांचे मन जिंकले आहे. किकवी गावात या गणेशोत्सवाला श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.