Bhor News –“विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर” ही मराठीतील जुनी म्हण भोर तालुक्यातील माळेगाव येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. येथील एका घरात मादी लाल विंचू आपल्या छोट्या पिल्लांना पाठीवर घेऊन बसलेली आढळल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. निसर्गातील मातृत्व आणि वन्यजीवांचे अनोखे जीवनचक्र दाखवणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. माळेगाव येथील दौलत कोळी यांच्या घरी कांदा भरण्याचे काम सुरू होते. घराशेजारील कोंबड्यांच्या खुराड्याची (डालग्याची) साफसफाई करताना एका कोपऱ्यात विंचू दिसून आला. सुरुवातीला तो सामान्य वाटला; मात्र जवळून पाहिल्यानंतर त्याच्या पाठीवर अनेक लहान पिल्ले असल्याचे दिसले. हे दुर्मिळ दृश्य पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. विंचवाच्या जीवनशैलीतील मातृत्वाची वागणूक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. पिल्लांच्या जन्मानंतर मादी त्यांना पाठीवर घेऊन फिरते. या पिल्लांना “स्कॉर्पलिंग” म्हटले जाते. पिल्लांची पहिली कात टाकेपर्यंत आई त्यांचे संरक्षण करते. यामुळेच ही म्हण या घटनेतून प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच ‘पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशन’चे सदस्य श्रीकांत खेडकर आणि विशाल शिंदे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काळजीपूर्वक मादी विंचू व तिच्या पिल्लांना प्लास्टिकच्या जारमध्ये सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्यांना डोंगराळ भागातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. यामुळे पिल्लांची वाढ नैसर्गिक वातावरणात व्यवस्थित होईल, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली. अत्यंत विषारी प्रजाती हा ‘भारतीय लाल विंचू’ (हाॅटेनटोटा टॅमुलस) भारतातील अत्यंत विषारी विंचवांपैकी एक मानला जातो. तो सहसा उष्ण, दमट आणि अंधाऱ्या जागांमध्ये राहतो. थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी विंचू भेगा, खडकाखाली, लाकडांच्या ढिगाऱ्यात किंवा बिळांमध्ये लपतात. ग्रामीण भागातील खुराडे, शेती परिसर आणि ओलसर जागा हे त्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत.