Bhor News – भोर येथील दीक्षाभूमी स्मारक समितीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून गेटचे कुलूप तोडल्याप्रकरणी भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे व मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्मारक समितीने दिला. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या दाव्यानुसार, भोर नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नं. २४९ मधील २७३१. ६० चौ. मी. जागा २०१६ च्या ठरावानुसार समितीच्या ताब्यात आहे. मात्र, नगरपरिषदेने या जागेत ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा सुधारणा’ योजनेअंतर्गत २. ५० कोटी रुपयांचा निधी नवीन इमारत बांधण्यासाठी प्रस्तावित केला आहे. समितीला विश्वासात न घेता हा निधी प्रस्तावित केल्याने समितीने यापूर्वीच लेखी तक्रार दिली होती. २२ एप्रिल रोजी या कामाचे भूमीपूजन करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला, ज्याला समितीने तीव्र विरोध दर्शवला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बैठक पार पडली. यामध्ये आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले होते. मात्र, बैठक संपल्यानंतर आमदार शंकर मांडेकर, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे आणि मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह दीक्षाभूमी परिसरात जाऊन गेटचे कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप समितीने केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी समितीचे उपाध्यक्ष शंकर माने, महेंद्र साळुंखे, अर्जुन शेलार, रवींद्र कांबळे, बाळासाहेब अडसूळ, सुनंदा गायकवाड, मनोहर गोरे, मुन्ना गायकवाड, संदिप जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. “दीक्षाभूमी समोरील क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. ज्या गेटमधून आम्ही आत गेलो, त्याला कुलूपच नव्हते. त्यामुळे कुलूप तोडण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्यावर खोटे आरोप केले जात असून ही मोठी शोकांतिका आहे.” – शंकर मांडेकर, आमदार, भोर विधानसभा.