प्रभात वृत्तसेवा भोर – भोर नगरपरिषदेची मतमोजणी कान्होजी जेधे शासकीय प्रशिक्षण संस्था, भोर येथे रविवारी (दि.२१) पाच फेरीत होणार असून एका तासात निकाल लागणार असल्याचे, सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले. रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलला चार कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून दोन जण उपस्थित असणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये एक ते पाच प्रभागमधील अ क्रमांकाची मतमोजणी, दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाच मधील ब क्रमांकाची मतमोजणी, तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ व दहा अ क्रमांकाची व प्रभाग चार मधील क नंबरची मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, दहा ब ची आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील अ ची मतमोजणी होणार आहे. पाचव्या फेरीत प्रभाग क्रमांक आठ क आणि प्रभाग क्रमांक नऊ ब ची मतमोजणी होणार आहे. सर्व पाचही फेऱ्यांची मतमोजणी झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निकाल जाहीर होणार आहे.