प्रभात वृत्तसेवा नसरापूर – किकवी गावात (ता. भोर) दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अल्पवयीन मुलाला अडवून धमकी देत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किकवी येथील अमृत हरीश्चंद्र आहीरे यांचा मुलगा चैतन्य हा शनिवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास खेळण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवीकडे जात होता. त्यावेळी पंचशिलनगरकडे जाणाऱ्या पुलावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याला अडवले. तोंड शांत नाही ठेवले तर मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलाला हाताने मारहाण करण्यात आली. आरोपींपैकी एकाने ब्लेडने वार करून चैतन्यला दुखापत केली. शिवीगाळ व दमदाटी करत दोघेही आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाले. या घटनेत चैतन्य जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. भरदिवसा अल्पवयीन मुलावर हल्ला झाल्याने किकवी गावात भीतीसह संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, या घटनेचा तपास राजगड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.