Bhor accident – भोर तालुक्यातील केळवडे गावच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. पुणे–सातारा महामार्गावर हॉटेल मावळ प्रांत समोर साताऱ्याकडे जाणारा कंटेनर अचानक पलटी झाल्याने चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एम एच ११ सी एच २४९९) पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने जात होता. रात्री अंदाजे १ वाजण्याच्या सुमारास केळवडे गावाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कंटेनर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की चालक कंटेनरखाली अडकला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही नागरिकांनी पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. या भीषण अपघातात चालक हनुमंत शंकर धोंडे (रा. चिखलगाव, ता. भोर) यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ आणि महामार्गावरील वाहतूक यामुळे मदतकार्य करताना मोठी कसरत करावी लागली. काही काळ या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा तांत्रिक बिघाड यापैकी कोणते कारण अपघातास कारणीभूत ठरले असावे याचा तपास सुरू आहे.