वडगाव मावळ, (वार्ताहर) – आंदर मावळात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आता नक्की कमी होईल. या विकासकामांना प्रारंभ करून भविष्यातल्या प्रगत मावळची मुहूर्तमेढ रोवली जात आहे, असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. आमदार शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विविध विकासकामांचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आंदर मावळ विभागातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे, लहान पुलाचे बांधकाम करणे, डोंगरवाडी ते वडेश्वर धनगर पठार रस्ता सुधारणा करणे आणि सटवाईवाडीतील अंतर्गत रस्ते करणे अशा विविध विकासकामांचा समावेश यामध्ये आहे. या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. येथील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १० कोटी २० लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच पठारावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. पाऊस काळात येथील नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटत असे. या कामांमुळे भविष्यात हा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे, असे आमदार शेळकेंनी सांगितले.