कराड (प्रतिनिधी) – महायुती सरकारच्या माध्यमातून आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील कालवडे व कासारशिरंबे गावांमधील विविध विकासकामांसाठी सुमारे ४ कोटी ८५ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे.
या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. भोसले यांच्या हस्ते कालवडे व कासारशिरंबे येथे मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून १० पाणंद रस्ते, राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पामधून कालवडे-बेलवडे– कासारशिरंबे-साळशिरंबे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सुधारणा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. मनेरगा अंतर्गत कालवडे येथे ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले, त्याचे लोकार्पणही करण्यात आले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याने व ग्रामविकास खात्याने आपल्या भागात कोट्यवधींचा विकासनिधी दिला आहे. आपल्या मतदारसंघात रस्ते सुधारणा, पूल उभारणीसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे.
आपल्या मतदार संघावर महायुती सरकारचे विशेष लक्ष असून, एखाद्या मतदारसंघात आमदाराला जेवढा निधी मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी आपल्या कराड दक्षिणला मिळाला आहे.
शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना सुरु केल्या असून, त्याचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, संतोष पाटील, ज्येष्ठ नेते बाबुराव यादव, पै. दादासाहेब थोरात, कासारशिरंबेचे सरपंच उमेश महाजन, उपसरपंच संतोष यादव,
कालवडेचे उपसरपंच शुभम थोरात, सिद्धार्थ पाटील, मनोहर थोरात, शंकरराव थोरात, दादा तडाखे, माणिक आत्तरकर, माणिक थोरात, बालिश थोरात, आण्णासो पावणे, अमर पाटील, शिवाजी थोरात, अमोल थोरात, जयकर थोरात, हणमंत थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.