Pimpri : भोंदूबाबाकडून भक्तांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण

पिंपरी : ‘दिव्यशक्तीची आत्मभूती’ असल्याचा दावा करत, मृत्यूची भीती दाखवून भक्तांचे मानसिक शोषण करणाऱ्या आणि त्यांच्या खासगी क्षणांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश बावधन पोलिसांनी केला आहे.
प्रसाद उर्फ दादा भिमराव तामदार (२९, रा. सुसगाव, मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. नोव्हेंबर २०२४ पासून सुस गावातील एका इमारतीत हा बाबा भक्तांना “चार महिन्यांत मृत्यू होईल” अशी भीती दाखवून उपाय म्हणून ‘प्रेयसी किंवा वेश्या’शी संबंध ठेवण्याचा विकृत सल्ला देत होता. त्यादरम्यान तो भक्तांचा मोबाइल हातात घेत त्यांच्या परवानगीशिवाय ‘एअर ड्रॉईड कीड’ हे हिडन अॅप डाऊनलोड करून त्यांचा मोबाइल अॅक्सेस घेत असे.
हे अॅप वापरून बाबा त्यांच्या मोबाइल कॅमेऱ्याद्वारे त्यांचे खाजगी क्षण पाहून चित्रीकरण करत होता. हा प्रकार एका तरुण भक्ताच्या सायबर क्षेत्रातील मित्रामुळे उघडकीस आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत बाबाला अटक केली असून, त्याच्याकडील अॅप व मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
या प्रकारामुळे अनेक भक्त हादरले असून, पोलिसांकडे तक्रारींचा ओघ सुरू आहे. “अशा बाबांपासून सावध राहा, आणि फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तक्रार द्या,” असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी केले आहे. तपास बावधन पोलिस करत आहेत.





