khesari lal yadav – भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव याने राजदमध्ये प्रवेश केला. तो स्वत:च उमेदवार बनून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले. ती राजकीय घडामोड बिहारच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरूवारी रात्री तातडीची पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ३९ वर्षीय खेसारी आणि त्याची पत्नी चंदादेवी या दाम्पत्याच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. खेसारीची पत्नी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. मात्र, स्वत: खेसारीच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याला राजदने छपरा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याची माहिती नंतर समोर आली. आघाडीचा भोजपुरी अभिनेता, गायक म्हणून खेसारी ओळखला जातो. त्याचा बिहारमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे खेसारीचा प्रवेश राजदचे राजकीय बळ वाढवणारा मानला जात आहे. खेसारीची साथ मिळवून त्या पक्षाने मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. राजद बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. महाआघाडी यावेळी सत्ताधारी एनडीएला तगडी फाईट देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.