भिवंडी : भाजपपुढे आव्हान

भिवंडी हा खरे तर मुस्लीम मतदारांची संख्या अधिक असलेला मतदारसंघ आहे. 2014 मध्ये या मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी झाले तेव्हा सगळ्यांनी त्याचे श्रेय मोदी लाटेला दिले. तरीही मुस्लीम बहुल भागातून भाजपचा उमेदवार निवडून येणे हे खूप महत्त्वाचे होतेच. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपचे कपिल पाटील या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. 2014चा विजय हा केवळ मोदी लाटेचा नव्हता तर खऱ्या अर्थाने भाजपला येथील मुस्लिमांनी स्वीकारले आहे हे दाखवून द्यायची जबाबदारी आणि आव्हान कपिल पाटील यांना पेलायची आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे कपिल पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे सुरेश टावरे आमने सामने आहेत. यावेळी कपिल पाटील यांच्यापुढे हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असल्याने कॉंग्रेसला येथे यशाची आशा आहे. गेल्या वेळी कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कार्यकर्ते, नेते यांच्याशी असलेले जुने संबंध आणि कॉंग्रेसमध्ये उफाळलेला अंतर्गत वाद यांचा फायदा घेत यश मिळवले होते.

2009मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी लोकसभा हा खुल्या प्रवर्गाचा मतदारसंघ झाला. पुनर्रचनेनंतर झालेल्या निवडणुकीत सुरेश टावरे हेच या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले. 2009च्या निवडणुकीत टावरे यांनी भाजपच्या जगन्नाथ पाटील यांचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारालाही एक लाखांहून अधिक मते मिळाली आणि अपक्ष विश्‍वनाथ पाटील यांना 77 हजार मते मिळाली. 2014 मध्ये विश्‍वनाथ पाटील यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. कपिल पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपत आले होते, राष्ट्रवादीशी असलेल्या जुन्या लागेबांध्यांचा त्यांनी या निवडणुकीत वापर करून घेतला. त्याचबरोबर टावरे यांना डावलून विश्‍वनाथ पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने टावरे गट प्रचंड नाराज झाला आणि त्यांनी निवडणूक प्रचारात भागच घेतला नाही. त्याचाही फायदा कपिल पाटील यांना झाला होता.

पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. एक तर आघाडीतर्फे सुरेश टावरे हेच उमेदवार आहेत आणि त्यामुळे कॉंग्रेसमधील टावरे गट उत्साहाने कामाला लागला आहे. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नाही तर कॉंग्रेस आघाडीबरोबर आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचीही टावरे यांना मदत होणार आहे. शिवाय पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध आता कपिल पाटील यांच्या कामी येणार नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. भाजप-शिवसेना युती असल्याने आता कपिल पाटील यांना प्रचारात काही कमतरता राहणार नाही. पण त्यांना आपल्या कामाच्या जोरावरच मते मागावी लागणार आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण, भिवंडी याबरोबरच शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुका, वाडा हा ग्रामीण भागही येतो. या मतदारसंघात हिंदूंमध्ये आगरी आणि कुणबी यांचे प्राबल्य आहे, आणि मुस्लिमांची संख्याही लक्षणीय आहे. या लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचेच वर्चस्व आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, दोन शिवसेनेकडे आणि एक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

असे असले तरी कपिल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी अजिबात नाही. कारण त्यांनाही नाराज शिवसैनिकांना आपल्याबरोबर घेताना कसरत करावी लागत आहे. राज्यात भाजप-शिवसेना युती असली तरी भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते उमेदवार निवडीवरून नाराज आहेत आणि इथे उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे उघडउघड बोलत आहेत. साहजिकच शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी पाटील यांच्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले होते. पण निवडून आल्यानंतर पाटील यांनी शिवसैनिकांशी साधा संवादही कधी साधला नाही. त्यामुळे येथे शिवसेना त्यांच्यावर नाराज आहे. मतदारसंघात ठोस विकासकामे झाली नाहीत, वाडा नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांना सहकार्य करत नाहीत, वाडा पोलिस ठाण्यात भाजपने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. कपिल पाटील त्यांची समजूत काढत आहेत. पण स्थानिक शिवसैनिक कपिल पाटील यांच्या प्रचारात मनापासून सहभागी होतील का याची शंका आहे.

कपिल पाटील यांना जसा युतीअंतर्गत नाराजीला तोंड द्यावे लागत आहे, तशीच स्थिती कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांची आहे. भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसच्या 42 नगरसेवकांनी टावरे यांना जाहीर विरोध दर्शवला आहे. टावरे यांच्याऐवजी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊ इच्छिणारे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह या नगरसेवकांनी धरला.
2014 मध्ये सुरेश टावरे यांना डावलून विश्‍वनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी या दोघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे सुरेश म्हात्रे हे कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. कपिल पाटील यांना शिवसैनिकांचा विरोध आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसला म्हात्रेंना उमेदवारी देऊन घेता येईल, असे म्हात्रे यांचे म्हणणे होते. पण कॉंग्रेसने सुरेश टावरे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता पक्षांतर्गत राजकारणाला वेग आला आहे. 2014 च्या निवडणुकीत टावरे यांनी पक्षाचे उमेदवार विश्‍वनाथ पाटील यांच्याविरोधात काम केले. महापौर निवडणुकीतही त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. म्हणून टावरे यांच्यासाठी काम करणार नाही, असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला होता. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते.

वंचित बहुजन आघाडीचे ए. डी. सावंतही निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या निवडणूक लढवण्याचा कोणावर परिणाम होईल हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. खरी धुमश्‍चक्री कपिल पाटील आणि सुरेश टावरे यांच्यातच होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.