भिवंडी : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी परिसरात गरीब आणि वनवासी बांधवांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम सुरू असताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धाव घेऊन हा मोठा कट उधळला. याप्रकरणी पोलिसांनी एका अमेरिकन नागरिकासह 3 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ गणपती सर्पे, ठाणे (पश्चिम) येथील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारा जेम्स वॉटसन (मूळ अमेरिकेचा नागरिक) आणि मनोज गोविंद कोल्हा हे गावात महिला, पुरुष आणि मुलांना प्रार्थना करण्यासाठी, धार्मिक पुस्तकांमधून वाचन करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी एकत्र करत होते. जेम्स वॉटसन हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. तो सन 2016 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतात आला आणि नंतर बिझनेस व्हिसा मिळवून भारतातच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचे काम करत होता. कोणताही अधिकृत व्यवसाय न करता तो अनेक वर्षांपासून हे काम करत होता. स्थानिक रहिवासी रविनाथ सावजी भुरकुट यांनी हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली. घटनेची खात्री झाल्यावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत घटनास्थळावरून साईनाथ सर्पे, जेम्स वॉटसन आणि मनोज कोल्हा यांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. तिघांविरुद्ध महाराष्ट्र मानवी बलिदान आणि इतर अमानवी, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि निर्मूलन कायदा आणि परदेशी कायदा यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.