Bhiwandi News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन पोलिसांसह सहा जण जखमी झाले आहेत. भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे केव्हीए आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा हिंसाचार झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या या हिंसाचारात कोणार्क विकास आघाडी (केव्हीए) या स्थानिक राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड केल्याचा आरोप आहे. परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये लोक दगडफेक करत असल्याचे आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिस हस्तक्षेप करताना दिसत आहेत. आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला. तसेच त्यांनी माझ्या निवासस्थानी छापा टाकण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप भाजप आमदार महेश चौगुले यांनी केला आहे. या घटनेदरम्यान काही लोकांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. केव्हीएचे पदाधिकारी विलास पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले, आणि भाजप कार्यकर्त्यांनी आधी हिंसाचार सुरू केल्याचे म्हटले आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिस्थिती आणखी वाढू नये म्हणून परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. निजामपुरा पोलिस या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ९० सदस्य असलेल्या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला ३०, भाजपला २२, तर केव्हीएला ४ जागा मिळाल्या आहेत.