राजगुरूनगर : चांडोली येथील मागासवर्गीय समाजाच्या दफनभूमीवर काही धनदांडग्या व्यक्तींनी केलेले अतिक्रमण खेड तालुका भीमशक्ती संघटनेने थेट कारवाई करत जमीनदोस्त केले आहे. जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगत आणि भीमा नदी पुलाजवळ असलेल्या या कोट्यवधी रुपये किमतीच्या सरकारी जागेवर सिमेंट वस्तूंचा कारखाना आणि बांबू विक्रीच्या नावाखाली बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न झाला होता. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हे अतिक्रमण हटवले. या जागेवर कातकरी समाज आणि बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले जातात. २०१२ साली देखील अशाच प्रकारे एका प्रभावशाली व्यक्तीने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता, जो निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील व भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या आंदोलनामुळे उधळून लावला होता. आता पुन्हा एकदा या जागेवर अतिक्रमण झाल्याने भीमशक्ती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे आंदोलन विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी जिल्हा संघटक विक्रांत भोर, डॉ. नीता आल्हाट, माजी सरपंच आरती डोळस, तालुका अध्यक्ष अनिल जाधव, किशोर डोळस, दिलीप सोनवणे, बाळू वाघमारे, मंगेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. या जागेवर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा स्थापित करण्यात आली असून, सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाही मार्गाने हक्क मिळत नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. देश संविधानावर चालत असतानाही कोणी समाजाची जागा बळकावत असेल आणि प्रशासन न्याय देत नसेल तर भीमशक्ती गप्प बसणार नाही. आम्ही अतिक्रमण हटवून तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवली आहे. जर या प्रतिमेला कोणी धक्का लावला, तर राज्यभर जाळपोळ होईल आणि त्याचे तीव्र पडसाद उमटतील. गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी. – विजय डोळस, अध्यक्ष, भीमशक्ती संघटना, पुणे जिल्हा हेही वाचा : Ashok Kharat : अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराने कारणं सांगत केला मोठा दावा