प्रभात वृत्तसेवा मंचर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दुसर्या श्रावण सोमवारी सुमारे दोन लाख भाविकांनी जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय’ अशा घोषणा देत अधून मधून येणार्या श्रावण सरी, बोचरी थंडी व दाट धुक्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी शिवलिंगावर आकर्षक फुलांची सजावट केली होती.मागील 15 दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने निसर्ग सौंदर्य खुलले आहे. धबधबे खळखळून वाहत असून, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे येतात. यंदा श्रावण महिन्याच्या दुसर्या सोमवारच्या शनिवार व रविवारी सुट्यांच्या दिवशी भीमाशंकर येथे गर्दीचा महापुर उसळला होता. यात सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी दर्शनासह पर्यटंनाचा लाभ घेतला. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दर्शन घेतले आहे. वनविभागा एमटीपर्यंत दर्शन रांग होती. यातच पावसामुळे भीमाशंकर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यामुळे भाविक आणि पर्यटक डिंभे धरण, गोहे घाट यांसह विविध ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद लुटत होते. वाहतूक व्यवस्थित राहावी, यासाठी प्रशासनाने पाच वाहनतळांची व्यवस्था केली होती. मात्र, प्रचंड गर्दीमुळे वाहने 4 व 5 वाहनतळावर पार्क करावी लागली होती. तेथून एस. टीच्या गाड्या भाविक-भक्तांची वाहतूक सुरू होती. वाहतुक नियंत्रक टी. एन. पवळे, मारुती खळदकर, घोडेगाव सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार व देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, देवस्थान व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, गोरख कौदरे यात्रेच नियोजन करत होते. कोकणातुन शिडी घाट, गणपतीघाट, व बैल घाटाने मोठ्या संख्येने भाविक येत होते. तसेच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त वाढ.. खेड उपविभागीय पोलीस विभागांतर्गत घोडेगाव आणि खेड पोलीस ठाण्यांसह जिल्ह्यातून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये एक उपविभागीय पोलिस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, 25 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 160 पुरुष व 40 महिला पोलीस कर्मचारी, एक आरसीपी पथक, 34 होमगार्ड आणि श्वान पथकाचा समावेश होता.