Bhimashankar News – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येथे व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला असून भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, खासदारांना विशेष परवानगी देऊन दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार निशिकांत दुबे हे शनिवार दि. १४ रोजी भीमाशंकर येथे आले होते. ते हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंदिराच्या सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ९ जानेवारी २०२६ पासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी तसेच सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीत खासदारांसाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खासदार निशिकांत दुबे हे हेलिकॉप्टरने येऊन कार ने पार्किंग नंबर 2 पासून पुढे जात असताना घोडेगाव पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी थांबवले असता त्यांनी सांगितले की मी मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे, असे सांगितल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. “राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का?” असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का केला जात आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान मंचर,खेड प्रांत अधिकाऱ्यांकडे तसेच खेड आणि घोडेगाव पोलीस ठाण्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही किंवा त्यांना प्रोटोकॉल म्हणून कोणताही बंदोबस्त दिला नाही. मंदिरात संस्थांचे अध्यक्ष सुरेश कोदरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही.