Bhimashankar News – खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर गावाच्या नव्या पुनर्वसन आणि सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श ग्राम प्रकल्प विकास आराखडा संदर्भात शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार बाबाजी काळे हे दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत भीमाशंकर परिसरातील वाढती भाविक संख्या, वाहतूक कोंडी, पर्यावरण संवर्धन तसेच मूलभूत सुविधांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सुमारे १७२.२२ कोटींच्या विकास आराखड्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले असून निवासी गाळे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा, स्वच्छता सुविधा, हेरिटेज मार्केट, सौरऊर्जा, मंदिर परिसर विकास आदी विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रस्ते विकास, रोपवे प्रकल्प, वीजपुरवठा आणि पर्यटन सुविधांबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. दरम्यान यावेळी खेड तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे काही मागण्या केल्या त्यापैकी तळेगाव – आंबी करंजविहिरे – धामणेफाटा पाईट – पाळू- आडगाव सातकरवाडीमार्गे धामणगांव, शिरगाव असा रस्ता जोडला जावा. त्याचबरोबर करंजविहिरे – शिवे – गडद मार्गे भिमाशंकरला रस्ता जोडला जातो याचा समावेश व्हावा आणि अहिल्यानगर मार्गे शिक्रापुर – भिमाशंकरकडे जाताना मध्ये पाबळ ते कनेरसर सेझ पर्यंतचा १० किमी रस्त्याची दुरुस्ती व्हावी. आमदार बाबाजी काळे. तसेच भिमाशंकर जवळील पदरवाडीच्या १६ घरांचे पुनर्वसन भिमाशंकरवाडी या नवीन आराखड्यात व्हावे. या मागण्यांवर मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आदेश दिले. त्याचबरोबर खेड – भीमाशंकर महामार्गाला आणि शिरूर – उरण रस्त्याला मंजुरी दिल्याने सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. भिमाशंकर हे खेड तालुक्याच्याच नव्हे तर सर्व श्री महादेव भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने भिमाशंकर देवस्थानचा होत असलेला विकास हा अतिशय आनंद देणारा आहे. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “खेड-भीमाशंकर महामार्ग आणि शिरूर-उरण रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. भीमाशंकर हे खेड तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण महादेव भक्तांचे श्रद्धास्थान असल्याने देवस्थानाचा होत असलेला विकास आनंददायी आहे.” – बाबाजी काळे, आमदार खेड-आळंदी