Bhima Sugar Factory – दौंड तालुक्यातील येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाच्या बग्यासला सोमवार (दि. ३०) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या आसपास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बग्यासची वाहतूक करणाऱ्या आणि बग्यासनी भरलेला मालवाहतूक ट्रकला ही आग लागल्याने काही क्षणातच हा ट्रक जागीच जळून खाक झाल्याची घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना सध्या निराणी ग्रुप चालवत असलेल्या साखर कारखान्याच्या परिसरातील साठवण असलेल्या बग्यास (भुसा)ला सोमवारी (दि.३०) दहा वाजण्याच्या आसपास अचानक भीषण आग आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. वारा असल्याने आग काही क्षणातच परिसरात सगळीकडे पसरली. धुराचे लोट हवेत पसरले होते. या आगीच्या झळीमुळे संरक्षण भिंतीच्या मोटेवाडा बाजूकडील रस्त्यालगतचे गवत ही पेटले होते. तसेच याठिकाणी बग्यास वाहतूक करणाऱ्या एका भरलेल्या मालवाहतूक ट्रकने ही पेट घेतला, ट्रकला आग लागली असल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने वाहनातून उडी टाकली. त्यामुळे वाहनचालक या दुर्घटनेत बचावला आहे. भीमा साखर कारखाना कारखाना परिसरात साठा असलेल्या बग्यासला या आगीने विळखा घातला. या आगीत मोठ्या प्रमाणात बग्यास जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्याने कामगारांची एकच धांदल उडाली. तसेच कारखाना शेजारी रहिवासी ही या घटनेमुळे भयभीत झाले. दरम्यान, कामगार आणि नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दौंड नगरपालिका आणि कुरकुंभ औद्योगिक वसाहतीची अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. अंदाजे दोन ते तीन तास आगीची धग होती. तीन तासांनंतर ही आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने जीवित हानी नाही दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कारखान्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकली नाही. मात्र, या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक ट्रक जाळून जागीच खाक झाल्याने तसेच बग्यास ही मोठ्या प्रमाणात जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. या पूर्वी ही कारखाना परिसरात साठा असलेल्या या बग्यासला आग लागल्याची घटना घडली आहे. सातत्याने आग लागल्याची घटना घडत असून कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र आहे.