भक्तिमय वातावरणात भीम-कुंती भेटीचा सोहळा

उंब्रज – पांडुपुत्र भीमसेन महाराज व कुंती मातेच्या जयघोषात शकडो वर्षांची परंपरा असलेला भीम-कुंती भेटीचा उत्सव उंब्रज येथे सोमवारी गुलालाच्या उधळणीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. ‘भीम भीम राजेस राजेस महाराज की जय’च्या गजराने उंब्रजनगरी दुमदुमून गेली.
या उत्सवाची सुरुवात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला भीम मूर्तीसाठी वारुळाची काळी माती आणण्याने होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी उत्सवाचा मुख्य दिवस असतो. भीम-कुंती भेट हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. मिरवणुकीमध्ये कुंती मातेस रथात घेऊन बसण्यासाठी असलेल्या मानासाठी सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास भीमसेन मंडपात तोंडी लिलाव करण्यात आला. एक लाख दहा हजार रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक बोली लावून, सतीश प्रभाकर जाधव यांनी हा मान मिळवला.
दुपारी 1.45 च्या सुमारास भैरवनाथ मंदिराशेजारी महामुनी यांच्या घरी कुंती मातेची पूजा करून, कुंती मातेची मूर्ती घोड्यांच्या रथामध्ये विराजमान केली. सतीश जाधव हे रथात मूर्तीशेजारी बसले. त्यानंतर ही मिरवणूक भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत चौक, पेठेतील हनुमान मंदिरापासून मुख्य बाजारापेठेत आली. भाविकांनी रथावर गुलालाची उधळण केली. शेतकर्यांनी भाजीपाला, तर महिलांनी खण-नारळ, घुंची (टोपड्या) रथावर अर्पण केल्या. बँजोच्या तालावर तरुणांनी ठेका धरला होता. ही मिरवणूक पुढे कॉलेज रोडवर पाराजवळील मारुती मंदिरानजीक आली. मंदिर प्रदक्षिणा करून, बाजारपेठतून ही मिरवणूक सायंकाळी भीम मंडपात परत आली. यावेळी कुंती व भीमसेन या मायलेकरांच्या भेटीचा सोहळा झाला. मान्यवरांचे हस्ते पूजा झाल्यानंतर कुंती मातेची भीम मंदिरात स्थापना करण्यात आली.
उत्सवानिमित मेवामिठाई, खेळणी, आकाश पाळणे व मनोरंजनाची इतर साधनांनी बाजारपेठ फूलून गेली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भीम मंडपात भाविकांनी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती.





