प्रभात वृत्तससेवा भिगवण – भिगवण-बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात अपघात होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर मृत चालकाचा जळून कोळसा झाल्याचे पहावयाला मिळाले. त्यामुळे प्रशासन आणि परिवहन विभागाने मोकाट ऊस वाहतुकीवर अंकुश ठेवून निष्पाप नागरिकांच्या जीवाचा विचार करावा, अशी मागणी समोर येत आहे.याबाबत भिगवण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात अमोल राजू कुराडे (रा. नातेपुते, ता. माळशिरस) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात रात्रीच्या सुमारास घडला असून उसाने भरलेला ट्रक भिगवणकडून बारामतीकडे जात असताना भिगवण बाजूला उभा असणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाली. यात ट्रॅक्टरची डीझेल टाकी फुटल्याने आग लागली असावी. यामुळे दोन्ही वाहनाने मोठा पेट घेतला यात ट्रॅक्टर चालक अडकल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे कोणालाही मदत करणे शक्य झाले नाही त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक थांबली होती. भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरवात केली. आग विझविण्यासाठी दोन अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली. अग्निशमन यंत्रणा, पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणली गेली. यावेळी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. पोलिसांनी मदत करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले. आगीमुळे ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जळून मृत्यू झाला तसेच दोन्ही वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.