Newasa News : नवरात्रीत भेंडा गावाचा नवा आदर्श; ‘एक पेड प्रियजनों के नाम’ उपक्रमाने जिंकली मनं!
सण-उत्सव साजरे करताना केवळ आनंद न लुटता समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व कसे जपावे, याचा एक नवा आणि अनुकरणीय आदर्श भेंडा गावाने (Newasa News) घालून दिला आहे.

Newasa News : सण-उत्सव साजरे करताना केवळ आनंद न लुटता समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व कसे जपावे, याचा एक नवा आणि अनुकरणीय आदर्श भेंडा गावने (Newasa News) घालून दिला आहे. नवरात्रौत्सवाच्या पवित्र पर्वावर भेंडा गावात ‘एक पेड प्रियजनों के नाम’ या अनोख्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गावातील दानशूर नागरिकांनी दिलेल्या देणगीतून आणि सहभागातून गावाचा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणला गेला.
रविवार, १२ ऑक्टोबर रोजी भेंडा व्यापारी पेठ, गाडी यार्ड, बसस्थानक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात देशी प्रजातींच्या (Newasa News) रोपांची लागवड करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या शिंदे यांच्या हस्ते वड, खाया आणि बेहडा अशा पर्यावरणपूरक आणि दीर्घायुषी ठरणाऱ्या २० देशी झाडांचे रोपण करून या मोहिमेचा प्रारंभ झाला.
आपल्या हयातीत नसलेल्या अथवा लाडक्या व्यक्तींच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून ग्रामस्थांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांच्या आठवणींना चक्क ‘हिरवे रूप’ दिले. या स्तुत्य उपक्रमासाठी आबासाहेब काळे, सुनील वांढेकर, संजय मनवेलीकर, सुखदेव फुलारी, असिफ पठाण, अनिल नजन, शामल भंडारी, प्रमोद शिरोळे, रामेश्वर गव्हाणे, अजित रसाळ, राहुल वाघडकर, डॉ. दिलीप यादव, अक्षय वायकर, अरुण गोर्डे, सतीश फुलारी आणि रमेश गोर्डे आदींनी सढळ हाताने आर्थिक मदत करत मोलाचा हातभार लावला.
याप्रसंगी मोहिमेचे प्रमुख डॉ. शिवाजी शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना वाढत्या जागतिक तापमानावर (ग्लोबल वॉर्मिंग) तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “आज संपूर्ण पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. महाराष्ट्रात काही भागांत पारा तब्बल ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. मानवाने केलेली बेसुमार वृक्षतोड आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे निसर्गाचा समतोल पार ढासळला आहे.
जल, जंगल आणि वायू प्रदूषणाला आपण स्वतःच जबाबदार असून याचे गंभीर चटके आपल्यालाच सोसावे लागत आहेत. या भीषण संकटावर मात करण्याचा एकमेव खात्रीशीर उपाय म्हणजे व्यापक वृक्षारोपण करणे हाच आहे. म्हणूनच भेंडा परिसरात ही हरित मोहीम हाती घेण्यात आली असून आज लावलेली ही झाडे उद्याच्या पिढीला सुखाची सावली देतील.” तसेच लग्नसोहळे, वाढदिवस किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्चाला कात्री लावून नागरिकांनी अशा निसर्गसंवर्धनाच्या कामांना हातभार लावावा, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.
या सामाजिक आणि पर्यावरणीय मोहिमेत अजित रसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, जलमित्र सुखदेव फुलारी, डॉ. संतोष फुलारी, सुनील वांढेकर, अशोक पंडित, सुनील गव्हाणे, अरुण गोर्डे, असिफ पठाण, डॉ. विजयकुमार मुळे, अशोक गोरे, गणेश शेलार, प्रदीप फुलारी, रामभाऊ देशमुख, विकास गायकवाड, मनोज सोनवणे तसेच आरोग्य सेविका वर्षा बनसोडे यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने (Newasa News) सहभागी झाले होते.






