Bhausaheb Bhoir – अजितदादा शरीराने गेले असले तरी आत्मा अमर आहे. ते यांचा कारभार पाहत असतील, कोण काय करत आहे. आज भाजपामध्ये सर्वजण हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांनी तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्तराई होण्यासाठी तरी लाजेखातर हे अजितदादांचा पुतळा करतील अशी जहरी टीका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली. सोमवारी (दि. ९) महापालिका भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भोईर म्हणाले, अजितदादांचा पुतळा करण्याबाबत अजून सर्वसाधारण सभेत ठराव झाला नाही. मात्र, अजितदादांच्या उपकारातून यांना उत्तराई व्हावे लागेल. त्यांनीच यांना सगळ्यांना घडवले आहे. त्यामुळे अजितदादांचा पुतळा शहरात होईलच. गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये अनेक चुकीची कामे झाली आहेत. या माध्यमातून या शहराची वाट लावण्याचे काम आता देखील सत्ताधारी करतील. मात्र, शहराला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रकल्पाची मी पाहणी करणार आहे. तसेच झालेल्या चुकीच्या कामांची चौकशी देखील करण्याची मागणी करणार. भाजपचे पदाधिकारी महापालिकेत महिला अधिकाऱ्यांना धमकी देतात. याची चौकशी करून भाजपने त्याच्यावर कारवाई करावी. तसेच त्याच्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे. डीपी रद्द करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहे. शहरात सुरक्षित वातावरण नसून आज शाळेतील मुली देखील सुरक्षित नाही. या सगळ्यावर काम करण्याची गरज आहे. फक्त विरोध करायचा म्हणून नाही तर शहराला वाचविण्यासाठी चुकीच्या कामांना विरोध करणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना मस्ती? प्रशाकीय राजवटीमध्ये सगळेच नाही पण काही अधिकाऱ्यांना आपणच मालक असल्याचे वाटत होते. त्यामधून अनेक चुकीच्या कामांना यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आपण मालक नसून लोकांचे सेवक आहोत हे विसरू नये. यापुढे अधिकाऱ्यांचा असा मस्तवालपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा देखील भोईर यांनी यावेळी दिला.